Wednesday, October 25, 2017

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला

Purandar Fort entrance 2.jpg


सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैर्‌ऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.

पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते

इतिहास

पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बंधाताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनीअनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १२ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला.

पुरंदरचा तह

शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदराला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते.

'तेव्हा पूरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठान पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरंधर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.'


खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
  1. पुरंदर
  2. रुद्रमाळ
  3. कोंढाणा
  4. रोहिडा
  5. लोहगड
  6. विसापूर
  7. तुंग
  8. तिकोना
  9. प्रबळगड
  10. माहुली
  11. मनरंजन
  12. कोहोज
  13. कर्नाळा
  14. सोनगड
  15. पळसगड
  16. भंडारगड
  17. नरदुर्ग
  18. मार्गगड
  19. वसंतगड
  20. नंगगड
  21. अंकोला
  22. खिरदुर्ग (सागरगड)
  23. मानगड

    ८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
  1. बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकर्‍याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
  2. पुरंदरेश्वर मंदिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंती धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
  3. रामेश्वर मंदिर: पुरंदेश्वर मंदिराच्या मागील कोपर्‍यात पेशवे घराण्याचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशवांच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच माणूस दिल्ली दरवाजापाशी येतो.
  4. दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
  5. खंदकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खंदकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
  6. पद्मावती तळे: मुरारबजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
  7. शेंदर्‍या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेंदर्‍या बुरूज.
  8. केदारेश्‍वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायर्‍या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्‍वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, कर्‍हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
  9. पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणार्‍या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरावखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
  10. भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
  11. वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.

गडावर जाण्याच्या वाटा

पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
  1. पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अंतरावर असणार्‍या सासवड या गावी यावे लागते.
  2. सासवडहून: सासवडहून सासवड - भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणार्‍या 'पुरंदर घाटमाथा' या थांब्यावर उतरतात. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.

राहण्याची सोय

किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्‍या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे.येथे जाताना कोणतेही आयडी कार्ड घेऊन जावे (आधार ,पँन कार्ड, मतदान ओळखपञ इत्यादी)

जेवण्याची सोय

जेवण्याची सोय स्वतः करावी लागते. पिण्याचे पाणी मात्र बारमाही उपलब्ध आहे.

मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा


रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे.

रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे. मुरुडच्यापुढे दंडा आणि राजपुरी ही गावे समुद्रकिनारी आहेत. मुरुडपासून राजपुरी चार पाच किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव खाडीच्या किनार्‍यावर आहे. या राजपुरी गावाच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड-जंजिरा आहे. राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे.
जंजिराचा अर्थ समुद्राने वेढलेला किल्ला. भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र, याशिवाय मुरुड-जंजिराच्या तटावर ५७२ तोफा आहेत. त्यामुळेच हा जंजिरा अभेद्य होता. या तोफांमध्ये विशेष मोठी आणि लांब पल्ल्याची कलाल बांगडी ही तोफ होती. शिवाजीच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.

इतिहास

जंजिरा हा शब्द अरबी भाषेतून आपल्याकडे रुढ झालेला आहे. अरबी भाषेतील जझीरा या शब्दावरुन तो आलेला आहे. जझीरा म्हणजे बेट. या बेटावर पूर्वी एक मेढेकोट होता. त्यावेळी राजपुरीला मुख्यतः कोळी लोकांची वस्ती होती. या कोळ्यांना लुटारू आणि चाचे लोकांचा नेहेमीच उपद्रव होत असे. तेव्हा या चाच्यांना प्रतिबंध करण्यासाठी या बेटावर मेढेकोट उभारण्यात आला. मेढेकोट म्हणजे लाकडाचे मोठाले ओंडके एका शेजारी एक रोवून तयार केलेली तटबंदी. या तटबंदीमध्ये कोळी लोक सुरक्षितपणे रहात असत. त्यावेळी त्यांचा प्रमुख होता राम पाटील. हा मेढेकोट बांधण्यासाठी त्यावेळी निजामी ठाणेदाराची परवानगी घ्यावी लागली होती. मेढेकोटाची सुरक्षितता लाभताच राम पाटील त्या ठाणेदाराला जुमानेसा झाला. त्यामुळे ठाणेदाराने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिरमखानाची नेमणूक केली.
राम पाटील आपल्याला मेढेकोटाच्या जवळही फिरकू देणार नाही, याची कल्पना पिरमरखानाला होती. तो अतिशय चतुर होता. त्याने आपण दारूचे व्यापारी आहोत, असे भासवून आपली गलबते खाडीत नांगरली. राम पाटीलाशी स्नेह राहावा म्हणून दारूची काही पिंपे त्याने भेट म्हणून पाठवली. त्यामुळे राम पाटील खूष झाला. पिरमखानाने मेढेकोट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पिरमखान मेढेकोटात गेला. रात्री सर्व कोळी दारू पिऊन झिंगले असताना पिरमखानाने बाकीच्या गलबतांमधून असलेले सैन्य तेथे उतरवून सर्वांची कत्तल करून मेढेकोट ताब्यात घेतला.
पुढे पिरमखानाच्या जागी बुर्‍हाणखानाची नेमणूक झाली. त्याने तेथे भक्कम किल्ला बांधण्याची परवानगी निजामाकडून मिळवली. सध्याचे जे बांधकाम आहे ते या बुर्‍हाणखानाने बांधलेले आहे. पुढे इ.स.१६१७ मध्ये सिद्दी अंबर याने बादशहाकडून स्वतंत्र सनद मिळवून जहागिरी प्राप्त केली. जंजिरा संस्थानचा हा मूळ पुरुष समजला जातो.
जंजिऱ्याचा पुरातन झेंडा
जंजिर्‍याचे सिद्दी हे मूळचे अबिसीनियामधील असून, हे दर्यावर्दी शूर, काटक व दणकट होते. त्यांनी प्राणपणाने जंजिरा लढवला. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्‍न केला. पण तो यशस्वी होऊ शकला नाही. छत्रपती शिवाजी राजांनाही जंजिर्‍यावर स्वामित्व मिळवता आले नाही. इ.स.१६१७ ते इ.स.१९४७ अशी ३३० वर्षे जंजिरा अंजिक्य राहिला. जंजिर्‍याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. होडीने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यावर, या प्रवेशद्वाराच्या आत एक उपदार आहे. प्रवेशद्वाराजवळ एक शिल्प आहे. बुर्‍हाणखानाची दर्पोक्तीच या चित्रातून दिसून येते. एका वाघाने चारही पायात चार हत्ती पकडले आहेत व शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे, असे ते चित्र आहे. बुर्‍हाणखान इतर सत्ताधीशांना सुचवतो आहे की, "तुम्ही हत्ती असाल, मी पण शेर आहे. या किल्ल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नका."
या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.

किल्ल्याची अवस्था

जंजिर्‍याची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे ही एक दरवाजा आहे. असे एकोणीस बुलंद बुरूज आहेत. दोन बुरुजांमधील अंतर ९० फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग पायर्‍या ठेवलेल्या आहेत. तटबंदीमध्ये कमानी आहेत. त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवलेल्या आहेत. जंजिर्‍यावर ५१४ तोफा असल्याचा उल्लेख आहे. यातील कलालबांगडी, लांडाकासम व चावरी या तोफा आजही पाहायला मिळतात.
किल्ल्याच्या मध्यभागी सुरुलखानाचा भव्य वाडा आज पडक्या अवस्थेत आहे. पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. किल्ल्यामध्ये पूर्वी तीन मोहल्ले होते. यातील दोन मोहल्ले मुसलमानांचे व एक इतरांचा असे होते. पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती. राजाश्रय संपल्यानंतर ती सर्व वस्ती तेथून उठून गेली.
जंजिर्‍याच्या तटबंदीवरुन विस्तृत प्रदेश दिसतो. यात समुद्रात बांधलेला कासा उर्फ पद्मदुर्ग व किनार्‍यावरील सामराजगड हेही येथून दिसतात. ३३० वर्षे अभेद्य आणि अंजिक्य राहिलेल्या जंजिरे मेहरुब पाहताना इतिहासातील अनेक पर्वांचा आलेख आपल्या नजरेसमोरून तरळून जातो. थोडा इतिहासाचा अभ्यास करुन जंजिर्‍याला भेट दिल्यास ती निश्चितच संस्मरणीय ठरेल.'
असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.

वासोटा किल्ला


वासोटा किल्ला


Image result for vasota fort


साहसाची अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.

तर चला जाणून घेयुयात आपण वासोटा किल्ला बद्दल



इतिहास 
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजीच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत
शिवाजीने जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.
अफझलखाच्या वधानंतर शिवाजीच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.


वासोट्याला जाण्यासाठीचे रस्ते

वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणमधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील 'चिपळूण'कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते..
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.
या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.

वासोटा गडावर

गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला 'मिश्रदुर्ग' म्हटले जाते. येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणार्या पवनुर्जा प्रकल्पातील पवन्चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात.

Monday, October 23, 2017

राजगड किल्ला



राजगड किल्ला





Image result for rajgad


राजगड हा किल्ला पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आहे सदर किल्ला हा  समुद्र सपाटीपासून  १३९४ मीटर फुट उंचीवर आहे राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती.

तर चला जाणून घेयुयात आपण राजगड बद्दल



.





इतिहास 
राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदावी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.
नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.
१)'राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते शिवाजी भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.' -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- 'राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.'
३) महेमद हाशीम खालीखान हा 'मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ' नामक ग्रंथामध्ये म्हणतो,'राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग त्याचा घेर बारा कोसांचा त्याला सगळीकडून वेढा घालणे कठीण होते.
सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. एका ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला, निजामशाहीकडून आदिलशाही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला.
१६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला.
शिवाजीने मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणते की, 'मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. बखरकार सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणले आहे.' मात्र शिवाजीने तोरण्यापाठोपाठ हा डॊंगर जिंकून घेतला, हे नक्की. डॊंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवाजीच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मॊगलांना माघार घ्यावी लागली.
शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे'सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली. वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे, निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.'
शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली.

पहाण्यासारखी ठिकाणे : 

राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.

गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.


सुवेळा माची

पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे; एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.


पद्मावती तलाव

पद्मावती तलाव

गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.


राजवाडा बालेकिल्ला

राजवाडा

रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.
पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.


गुंजवणे दरवाजा

गुंजवणे दरवाजा

गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवाजीपूर्व काळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते.
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर,सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत.याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.


पद्मावती मंदिर

पद्मावती मंदिर

२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजीने किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूरती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. तियाच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजीने स्थापित केलेली आहे. या दोन मूर्तीच्या मध्ये पहारेकऱ्यां देवड्या आहेत. शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.

संजीवनी माची

सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजीच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
आळू दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जात असे. आळू दरवाजा सद्यास्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाज्यावरील शिल्पात. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे दाखवले आहे.
सुवेळा माची : मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनीएवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते.
आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागातसुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

चिलखति बुरूज

काळेश्र्वरी बुरूज आणि परिसर

सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो.

बालेकिल्ला

राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

गडावर कसे पोहचल 
कर्जत, पाली, पुणे, गुंजवणे या बसस्थानकांवरून जाणाऱ्या महाराष्ट राज्य परिवहन मंडळाच्या एस्टी गाड्या किंवा खाजगी वाहने.
गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. १.गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.
२.पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात
३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये.
४.आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.
५.गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.
राहण्याची सोय: 
१.गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२.पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.

जेवणाची सोय: 
आपण स्वतः करावी.

पाण्याची सोय: 
पद्मावती मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याचे बारमाही टाके आहे.

जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास



Thursday, June 15, 2017

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला



लोहगड हा किल्ला लोणावळ्याजवळ आहे सदर किल्ला हा  समुद्र सपाटीपासून ३४२० फुट उंचीवर आहे भारत सरकरने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

तर चला जाणून घेयुयात आपण लोहगड बद्दल


                              


इतिहास : लोहगडावर सातवाहनचालुक्यराष्ट्रकूटयादव या सर्वांची राजवट राहिली आहे. सदर किल्ला हा अतिशय मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. किल्ल्यापासून जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. सातशे वर्षांपूर्वी किल्ल्याची निर्मिती झालेली असावी.
      इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली व स्थापनेनंतर  अनेक किल्ले जिंकले. लोहगड हा त्यापैकीच एक आहे.त्यानंतर इ.स. १६३० मध्ये हा किल्ला आदिलशाहीत आला. शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये कल्याण व भिवंडी परिसर जिंकला व लोहगड–विसापूर का किल्लाही आपल्या ताभ्यात घेतला 
       त्यानंतर इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा एकदा  किल्ला परत जिंकला.
        पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्‍यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बोंबले याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीन मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा-शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली. नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुर्‍यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसर्‍या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसर्‍याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

पहाण्यासारखी ठिकाणे : 


१. गणेश दरवाजाः-  ह्या दरवाज्याचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाज्याच्या उजव्या व डाव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटिलकी देण्यात आली होती.येथे आतील बाजूस शिलालेख आहेत.
२. नारायण दरवाजाः-  नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधला होता. दरवाज्याजवळ एक भुयार आहे या भुयाराचा वापर हा भात व नाचणी साठवून ठेवण्यासाठी करण्यात येत असे.
३. हनुमान दरवाजाः- हा सर्वात जुना व प्राचीन दरवाजा आहे
४. महादरवाजाःहा गडाचा मुख्य दरवाजा असून या वरती हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्याही दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले होते. 

          दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर एक दर्गा लागतो. दर्ग्याच्या शेजारी सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. दर्ग्याच्या बाहेर बांधकामासाठी लागणारा  चुना बनविण्याची घाणी आहे.उजवीकडे ध्वजस्तंभ आहे.धाज्स्थाम्बाच्या उजवीकडे चालत गेल्यास लक्ष्मी कोठी आहे.ध्वज्स्तंबा शेजारी काही शिवप्रेमींनी सिमेंटचा चौथरा बांधला असून त्या ठिकाणी तोफ आहे.दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवटयाचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे. पुढे सरळ चालत गेल्यावर एक छोटेसे तळे आहे. हे तळे अष्टकोनी आकाराचे आसुन. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके देखील आहे. ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. तिथून पुढे पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास एक मोठे तळे आहे . नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे..मोठा तळ्याच्या पुढे  जातांना वाड्यांचे काही अवशेष दिसतात. गडावरून विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा भाग म्हणजे विंचूकाटा , लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचूकाटा आहे. हा विंचूकाटा म्हणजे पंधराशे मीटर लांब आणि तीस मीटर रुंद अशी ही डोंगराची सोंड आहे. विंचूकाटयावर जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते . .या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा उपयोग होत असावा.  विंचूकाट्याच्या खाली दाट जंगल आहे.गडावरून येतांना भाजे गावातील भाजे लेणी आवर्जून पहावीत.
        
         लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कड्याच्या टोकावर बांधलेली चिरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फारच कमी गडावर पाहायला मिळते. लोहगडवाडी पार केली की ही सर्पाकार आकाराची वाट सुरू होते. एकदा का कोणीहि या वाटेने वर आला की मग तो माणूस वर येईपर्यंत पाहारेकर्‍यांच्या नजरेत राहत असे. तो व्यवस्थित हेरला जात असे . वाटेवर वेगवेगळे बुरूज आहेत. त्यावरून बाहेरून येणाऱ्या माणसावर नजर ठेवता येते. वाटेवर गणेश दरवाजा, दुसरा नारायण, तिसरा हनुमान आणि चौथा महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. हनुमान दरवाजा जुना आहे. इतर तीन दरवाजे आणि एक उत्तम रेखीव जिना नाना फडणीस यांनी बांधून घेतला आहे. 

गडावर कसे पोहचल 

१.पुण्याहुन अथवा मुंबईहुन येत असाल तर लोणावळ्याच्या शेजारच्या मळवली स्थानकावर पॅसेंजर गाडीने किंवा लोकलने उतरावे. तेथून एक्सप्रेस हायवे पार करून भाजे गावातून थेट लोहगडला जाणारी वाट आहे . वाट मोठी आणि प्रशस्त असून.तिथून दीड तासांच्या चालीनंतर ‘गायमुख’ खिंडीत येऊन पोहचले कि खिंडीच्या अलीकडेच लोहगडवाडी गाव आहे. खिंडीतून उजवीकडे वळल्यास  लोहगडास आणि डावीकडे वळल्यास विसापूर किल्ल्यावर पोहचतो.

२. स्वतःचे वाहन असल्यास दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने थेट लोहगडवाडीपर्यंत जाता येते. सदर रस्ता घाटाचा असून अत्यंत धोकादायक वळणे आहेत.

३.काळे कॉलनी ही पवना धरणाजवळ वसलेली आहे.तेथून लोहगड आणि विसापूर मधील गायमुख खिंड परिसर व्यवस्थित दिसतो.पवना धरणाच्या खालून एक रस्ता गायमुख खिंडीच्या डावीकडील टेक टेकडीवर जातो तेथून एक मळलेली पायवाट आपणास लोहगडवाडीत घेऊन जाते. या टेकडीवर अग्रवाल नावाच्या इसमाचा बंगला आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास २ तास लागतात. 

खाण्याची सोय: गडावरती आपण स्वतः जेवणाची सोय करावी अथवा लोहगडवाडी मध्ये जेवणाची सोय होऊ शकते. 
पाण्याची सोय:  शिवमंदिरा पासून पुढे एक तले आहे तळ्याच्या बाजूला पाण्याचे टाके आहे गडावरती पाणी पिण्यासाठी हि एकमेव सोय आहे.

राहण्याची सोय: गडावरती लक्ष्मी कोठी आहे. येथे रहाण्याची एकमेव सोय आहे. ३५ ते ४० जण येथे आरामात राहू शकतात




पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला सह्याद्रीच्या  दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर  सिंहगड...